
सौ. मंगलताई रामचंद्र जगताप
(बी. ए., बी. टी.)
निवृत्त मुख्याध्यापिका
महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची, समाजसेवकांची तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटविलेल्या थोर विभूतींची भूमी. पुरोगामीत्वाचा वसा आणि वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जपणारी अनेक व्यक्तिमत्व समाजहितासाठी सतत झटताना दिसतात. शिक्षण क्षेत्र हे समाजाचे मुलभूत आणि अविभाज्य अंग आहे. महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता, कर्मवीरांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेला विशेष महत्व आहे. बहुजनांना शिक्षणाच्या मदतीने मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्रामुख्याने रयत शिक्षण संस्थेने केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई यांच्या असिम त्यागातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली आहे. त्यागाचा हा वारसा पुढे चालू ठेवणारं एक महत्वाचं नाव म्हणजे सौ. मंगलताई रामचंद्र जगताप.
मंगलताईंचा जन्म १ जुन, १९३६ रोजी कोल्हापुरात डॉ. गोविंदराव आणि सौ. सोनुबाई पवार यांच्या पोटी एका सुशिक्षित कुटुंबात झाला. ताईंना पाच भाऊ आणि दोन बहिणी. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंगलताईनी शिक्षणशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरातील महाराणी ताराबाई टीचर्स ट्रेनिंग कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. भारतातील जेष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक आणि त्यांच्या सुविद्य पत्नी चित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बी. टी. (आताचे बी. एड.) चे शिक्षण पूर्ण केले. चित्रा नाईक यांचा विशेष प्रभाव मंगलताईंवर पडला. चित्रा नाईक ह्या मंगलताईंच्या आदर्श होत.
१२ जुन, १९५७ रोजी मंगलताई कोल्हापुर जिल्ह्यातील रुकडी येथे रयत शिक्षण संस्थेच्या म. गांधी विद्यालयात सेवेत रुजू झाल्या. तेंव्हापासून ते आजपर्यंत त्यांचे आणि रयतचे नाते जोडले गेले ते कायमचेच. शाहू अध्यापक विद्यालय-कोल्हापूर, आष्टा (सांगली), निरा (पुणे), वाघोली (कोरेगाव,सातारा), पांडुरंग देसाई डी. एड. कॉलेज (कुसुर), कोळपेवाडी (अहमदनगर), यशवंत विद्यालय (कराड), कन्या विद्यालय (उंब्रज)-मुख्याध्यापिका पदावर, हुपरी (कोल्हापूर), वडगाव (हवेली-कराड) अशा एकूण ११ शाखांमध्ये ३३ वर्ष अध्यापनाचे काम करून १९९४ मध्ये वडगाव (हवेली) या शाखेतून मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. ताईंनी शिक्षक म्हणून काम करताना नेहमीच सर्व समाजातील विद्यार्थ्यांना आपले मानून कर्मवीरांचा वसा पुढे चालू ठेवला.
मंगलताईंचा विवाह श्री. रामचंद्र ज्ञानदेव जगताप यांच्या बरोबर २८ एप्रिल, १९५८ रोजी झाला. हा विवाह खुद्द कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय श्री. एम. एस. निकम यांनी घडवून आणला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेले आणि गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले श्री. रामचंद्र जगताप हे रयतचे विद्यार्थी ते रयत बॅंकचे चेअरमन असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. कर्मवीर ससून रुग्णालयात उपचार घेत असताना, त्यांची सेवा करण्यासाठी काही व्यक्ति ससून रुग्णालयात आळी-पाळीने जात असत, त्यात रामचंद्र जगताप होते. कर्मवीरांच्या इच्छेमुळे रामचंद्र जगताप शिक्षक झाले आणि संपूर्ण जीवन रयत शिक्षण संस्थेला वाहून घेतले. जगताप सरांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, कै. रा. तु. भोईटे स्मृती आरोग्य प्रतिष्ठान, बारामती यांचा राजमान्य राजश्री सखल गुणाले सदा यशवंत जेष्ठ व आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेत प्रथम माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, नंतर मध्यविभाग, दक्षिणविभाग येथे ‘इन्स्पेक्टर’ पदावर अत्यंत सचोटीने काम केले. रयत बँकेच्या चेअरमन पद देखील त्यांनी भूषविले. जगताप सर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांचे मामा श्री. पांडुरंग बाबू माने यांना गुरुस्थानी मानीत. श्री. रामचंद्र जगताप ह्यांचे १ डिसेंबर, २०१६ रोजी निधन झाले.
श्री. रामचंद्र आणि सौ. मंगलताई जगताप यांना चार मुले झाली, ही सर्व मुले उच्चविद्याविभूषित आणि समाजाशी आपले नाते प्रामाणिकपणे जपणारी आहेत. त्यातील पहिले डॉ. रणजीत जगताप यांचा पुण्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठा नावलौकिक आहे. दुसरे श्री. विवेक जगताप हे ऑटोमोबाईल इंजिनीअर आहेत, तिसरी मुलगी उर्मिला उच्चशिक्षित आहेत, चौथी मुलगी डॉ. वैजयंती ह्या दिल्ली येथे स्थायिक आहेत. एकंदरीतच संपूर्ण जीवन आणि मुलांच्या बाबतीत मंगलताई समाधानी आणि कृतार्थ आहेत.
श्री. रामचंद्र आणि सौ. मंगलताई हे आदर्श रयत सेवक असल्याने त्यांनी कर्मवीर आणि सौ. लक्ष्मीबाई यांच्या प्रमाणे आपणही निवृत्तीनंतरही बहुजन समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाकरिता भरीव काम करावे या प्रेरणेतून उंब्रज सारख्या ग्रामीण भागातील महिला महाविद्यालयास २० लाख रुपये देणगी देऊन मोठे आर्थिक सहकार्य केले. या त्यांच्या दातृत्वाचा सन्मान करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने महिला महाविद्यालय, उंब्रज यास सौ. मंगलताईंचे नाव देण्याचे ठरविले. त्यानुसार १८ जानेवारी, २०१४ रोजी विस्तारीत इमारत व नामकरण सोहळा सिक्किम राज्याचे राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील साहेब यांच्या शुभहस्ते, मा. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच डॉ. अनिल पाटील साहेब, चेअरमन रयत शिक्षण संस्था यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सौ. मंगलताई रामचंद्र जगताप ह्या कर्मवीरांच्या विचारांवर प्रचंड निष्ठा असणार्या आदर्श शिक्षिका, आदर्श माता, आदर्श पत्नी आणि महत्वाचे म्हणजे कर्मवीरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या आदर्श रयत सेवक आहेत. आपल्या शिक्षकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले संपूर्ण मानधन विद्यार्थ्यांकरिता देणगी स्वरुपात देणार्या आधुनिक सावित्रीबाईच आहेत.
लेखक
प्रा. विकास विलास बर्गे
ग्रंथपाल
सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय,उंब्रज, ता.-कराड, जि.- सातारा
२८ एप्रिल, २०२३